Tuesday, January 4, 2011

हो.. मी देव पाहिलाय !!

कसा असतो हो देव.... ??   ह्या प्रश्नाचे उत्तर बहुधा कोणालाच माहिती नसेल. पण एकंदरीत लोकांचे बहुमत घेतल्यास देवाची एक व्याख्या तयार होते ती म्हणजे, "ज्याच्याकडे अचाट शक्ती आहे, जो सर्वांपेक्षा बुद्धिमान आहे, जो सर्वांपेक्षा निराळा आहे, जे काम सामान्य व्यक्ती करू शकत नाही ते काम जो करू शकतो, ज्याला सर्व लोक बहुमताने मानतात तो म्हणजे देव". तर असा हा देव मी पाहिलाय ; आणि तो दुसरा तिसरा कोणीही नसून तो आहे 'क्रिकेटेश्वर' सचिन रमेश तेंडूलकर. देवाची व्याख्या पूर्ण होण्यासाठी लागणारे सर्व गुण ह्या देवमाणसात आहेत. अचाट शक्ती, एखादा चेंडू खेळताना वापरायची बुद्धिमत्ता, चतुराई त्याच्याकडे आहे. त्याची खेळण्याची शैली तर लई भारीच  आहे . ब्रेट ली, शेन वॉंर्न, वासिम अक्रम, अख्तर ह्यांसारखे महान गोलंदाजांनी ज्याच्यासमोर हात टेकले तो म्हणजे सचिन !!
               १७७ कसोटी सामन्यांमध्ये ५७ च्या सरासरीने त्याने १४५०० पेक्षा अधिक धावा ठोकल्या आहेत ज्यामध्ये ५१ शतके आणि ५९ अर्धशतकांचा समावेश आहे. तर एकदिवसीय क्रिकेट मधील ४४२ सामन्यांमधून त्याने १७६०० धावा कुटल्या आहेत त्या ४५ च्या सरासरीने व ह्यामध्ये ४६ शतके आणि ९३ अर्धशतकांचा समावेश आहे. एकदिवसीय क्रिकेट मधील सर्वोच्च स्कोर म्हणजे २०० धावा व हा विक्रम सुद्धा सचिनच्याच नावावर आहे. आपल्या २१ वर्षाच्या कारकिर्दीत त्याने अनेक विक्रम मोडले आहेत आणि नवीन विक्रम प्रस्थापित केले आहेत; म्हणूनच त्याला 'विक्रमादित्य' म्हणतात. वयाच्या १६ व्या वर्षी क्रिकेट मध्ये पदार्पण केलेला सचिन आज वयाच्या ३७ व्या वर्षी सुद्धा त्याच जिद्दीने व उत्साहाने खेळत आहे. त्याची धावांची भूक अजूनही कमी झालेली नाही.

                 सचिनची कीर्ती सातव्या आसमंतात पसरली असताना त्याचे पाय अजूनही जमिनीवरच आहेत हे विशेष. आजही त्याच्या स्वभावात कमालीची विनम्रता आहे. मैदानावर तसेच मैदानाबाहेरही सचिनचे वर्तन हे आदरास्पदच असते. म्हणूनच फक्त क्रिकेट क्षेत्रातीलच नव्हे तर इतर क्रीडाक्षेत्रातील खेळाडू सुद्धा नेहमी सचिनचा आदर्श घेतात.
                कदाचित ह्यामुळेच अनेक क्रिकेट तज्ञ सचिन हा क्रिकेट विश्वातील परमेश्वर आहे असे प्रांजळपणे म्हणतात.
                तर अशा ह्या क्रिकेटच्या दैवताला माझे कोटी कोटी प्रणाम आणि पुढील आयुष्यासाठी खुप खूप शुभेच्छा !!  
               

Monday, January 3, 2011

Hi-Fi तरुणाईसाठी Wi-Fi

आजच्या ह्या आधुनिक युगात वावरायचं म्हणजे आपल्या हाती कॉम्प्युटर हा हवाच , आणि एकदा कॉम्प्युटर आला की मग आपोआपच त्यासोबत इंटरनेट सुद्धा अगदी न सांगता येते. मग त्या इंटरनेट मधेही बरेच प्रकार येतात जसे कि डायल - अप इंटरनेट , ब्रॉडबेण्ड तसेच आत्ता नजीकच्या काळात आलेला नवीन प्रकार म्हणजे "वाय-फाय" !! चालू काळात ही वाय-फाय ची सुविधा म्हणजे लई-भारीच आहे असं म्हणता येईल. वाय-फाय म्हणजे "वायरलेस फिडेलिटी". इंटरनेटच्या लांबलचक वायर पासून मुक्तता मिळवण्यासाठी ही नवीन टेक्नोलॉजी अस्तित्वात आली आहे. ह्या सेवेचा वापर करण्यासाठी आपल्या मोबेइल , लेपटोप , कॉम्प्युटर किंवा इतर साधनांमध्ये वाय-फाय सुविधा असणं गरजेचं आहे. आपल्या मोबाईल अथवा कॉम्प्युटर मध्ये वाय-फायची सेवा उपलब्ध आहे असा संदेश दर्शवल्यास आपण ह्या सेवेचा लाभ घेऊ शकतो. ही सेवा वायरलेस असल्यामुळे वाय-फाय सिग्नल उपलब्ध असल्यास अगदी बागेत बसून किंवा विमानाने प्रवास करताना सुद्धा आपण इंटरनेट सर्फिंगचा मनमुराद आनंद लुटू शकता. नजीकच्या काळात जवळपास सर्व कॉलेजेस मध्ये वाय-फाय सुविधा बसवण्यात आली असल्यामुळे अनेक विध्यार्थी तसेच २० ते २५ वयामधील तरुणाई ह्या 'वायर नसलेल्या' जाळ्यात झपाट्याने अडकत चालली आहे . पण अर्थातच टेक्नोलॉजी आधुनिक असल्यामुळे ती थोडी खर्चिक आहे. ही सेवा परवडण्याजोगी नसल्यामुळे सामान्य लोक ह्या सुविधेपासून वंचित असून ते अजूनही जुनाट इंटरनेटच्या जाळ्यांमध्ये खितपत पडले आहेत ही फार खेदाची गोष्ट आहे.