Tuesday, January 4, 2011

हो.. मी देव पाहिलाय !!

कसा असतो हो देव.... ??   ह्या प्रश्नाचे उत्तर बहुधा कोणालाच माहिती नसेल. पण एकंदरीत लोकांचे बहुमत घेतल्यास देवाची एक व्याख्या तयार होते ती म्हणजे, "ज्याच्याकडे अचाट शक्ती आहे, जो सर्वांपेक्षा बुद्धिमान आहे, जो सर्वांपेक्षा निराळा आहे, जे काम सामान्य व्यक्ती करू शकत नाही ते काम जो करू शकतो, ज्याला सर्व लोक बहुमताने मानतात तो म्हणजे देव". तर असा हा देव मी पाहिलाय ; आणि तो दुसरा तिसरा कोणीही नसून तो आहे 'क्रिकेटेश्वर' सचिन रमेश तेंडूलकर. देवाची व्याख्या पूर्ण होण्यासाठी लागणारे सर्व गुण ह्या देवमाणसात आहेत. अचाट शक्ती, एखादा चेंडू खेळताना वापरायची बुद्धिमत्ता, चतुराई त्याच्याकडे आहे. त्याची खेळण्याची शैली तर लई भारीच  आहे . ब्रेट ली, शेन वॉंर्न, वासिम अक्रम, अख्तर ह्यांसारखे महान गोलंदाजांनी ज्याच्यासमोर हात टेकले तो म्हणजे सचिन !!
               १७७ कसोटी सामन्यांमध्ये ५७ च्या सरासरीने त्याने १४५०० पेक्षा अधिक धावा ठोकल्या आहेत ज्यामध्ये ५१ शतके आणि ५९ अर्धशतकांचा समावेश आहे. तर एकदिवसीय क्रिकेट मधील ४४२ सामन्यांमधून त्याने १७६०० धावा कुटल्या आहेत त्या ४५ च्या सरासरीने व ह्यामध्ये ४६ शतके आणि ९३ अर्धशतकांचा समावेश आहे. एकदिवसीय क्रिकेट मधील सर्वोच्च स्कोर म्हणजे २०० धावा व हा विक्रम सुद्धा सचिनच्याच नावावर आहे. आपल्या २१ वर्षाच्या कारकिर्दीत त्याने अनेक विक्रम मोडले आहेत आणि नवीन विक्रम प्रस्थापित केले आहेत; म्हणूनच त्याला 'विक्रमादित्य' म्हणतात. वयाच्या १६ व्या वर्षी क्रिकेट मध्ये पदार्पण केलेला सचिन आज वयाच्या ३७ व्या वर्षी सुद्धा त्याच जिद्दीने व उत्साहाने खेळत आहे. त्याची धावांची भूक अजूनही कमी झालेली नाही.

                 सचिनची कीर्ती सातव्या आसमंतात पसरली असताना त्याचे पाय अजूनही जमिनीवरच आहेत हे विशेष. आजही त्याच्या स्वभावात कमालीची विनम्रता आहे. मैदानावर तसेच मैदानाबाहेरही सचिनचे वर्तन हे आदरास्पदच असते. म्हणूनच फक्त क्रिकेट क्षेत्रातीलच नव्हे तर इतर क्रीडाक्षेत्रातील खेळाडू सुद्धा नेहमी सचिनचा आदर्श घेतात.
                कदाचित ह्यामुळेच अनेक क्रिकेट तज्ञ सचिन हा क्रिकेट विश्वातील परमेश्वर आहे असे प्रांजळपणे म्हणतात.
                तर अशा ह्या क्रिकेटच्या दैवताला माझे कोटी कोटी प्रणाम आणि पुढील आयुष्यासाठी खुप खूप शुभेच्छा !!  
               

2 comments: